Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भातून महायुतीच्या सर्वच लोकसभा उमेदवार पराभवाच्या छायेत ?

 

महायुती होणार सुकडासाफ! फक्त नागपूरची जागा आणीबाणीवर

News Today
दिलीप भोयर
वणी:- लोकसभेच्या निवडणुकीत कधी न बघितलेले वातावरण महाविकास आघाडीसाठी सकारात्मक दिसून येत असून यावेळी महायुतीचा संपूर्ण सुकडासाफ होण्याची शक्या आहे. केवळ नागपूरची जागा आणीबाणीवर दिसून येत आहे.

महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते सध्या विदर्भातील प्रचारात व्यस्त आहेत.  विदर्भामध्ये मोदीजी दोनदा येऊन गेले. काल-परवा नागपूरमध्ये मायावती आल्या होत्या . सिने कलाकार गोविंदा पुसद , उमरखेड आणि यवतमाळ मध्ये येऊन गेला. तर वणीत रविना टंडन, वरोरा येथे सुनील शेट्टी  पण लोकांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. दस्तुरखुद मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यवतमाळ व चंद्रपुर मध्ये येऊन गेले. उपमुख्यमंत्री फडणवीस येऊन गेले. असे अनेक नेते विदर्भाच्या प्रचार सभेला येऊन गेले तरीही महाराष्ट्रामध्ये भाजपाविरोधी प्रचंड लाट दिसून येत आहे. केंद्रात असलेले सरकार आणि राज्यात असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये सामान्य जनतेने आता एकजुटीने बंड पुकारल्याचे खेड्यापाड्यात दिसून येत आहे. आणि आणीबाणी नंतर जसे इंदिरा गांधी यांच्या विरोधामध्ये प्रचंड लाट होती. अगदी तशीच लाट आता महाराष्ट्रामध्ये मोदीविरोधी असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. भाजपाचे स्टार प्रचारक अमित शहा हे महाराष्ट्रात येऊन गेले परंतु त्यांचा भाषणाचा रोख हा नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना यांच्या पलीकडे गेला नाही. त्यांच्याकडे विकासाचे मुद्देच नाही. कलम 370 आणि प्रभू रामचंद्राचे मंदिर हे पूर्ण झाल्यामुळे आता लोकांना आकर्षित करण्यासारखा मुद्दा त्यांच्याकडे उरलेला नाही. एकमेकाची उणीदुणी काढूनच विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेते आपली सभा संपवताना दिसतात. शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव ,बेरोजगारी, प्रचंड वाढलेली महागाई, रोजगाराची कमतरता, आरोग्याची सुविधा, स्त्रियांवर होणारे हल्ले या व अशा अनेक समस्यावर कोणीही नेते बोलायला तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात गोंधळलेले सरकार आणि कंटाळलेली जनता असे सर्वत्र चित्र दिसून येत आहे.
ईडी आणि सिडीची भीती दाखवून शिवसेना फोडली. त्यानंतर ईडी आणि शिडीच्या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा फोडला. भ्रष्टाचारी लोकांना जवळ केल्यामुळे भाजपाची जी स्वच्छ पत होती ती निघून गेलेली आहे. प्रत्येक भ्रष्टाचारांचा एकच नारा आहे की जेल पेक्षा भाजपा बरा म्हणून मोठमोठे नेते भाजपाचा आसरा घेताना दिसत आहे. महाराष्ट्रातील या सगळ्या राजकीय घडामोडीमुळे राजकारणाचा पार जांगडबुंत्ता झालेला आहे. त्यामुळे राजकीय लोकांनी लोकशाही धोक्यात आणलेली आहे. खोटे बोला पण रेटून बोला असाच  सत्ताधारी लोकांचा स्वभाव असून आज लोकशाही वाचवण्याची खरी गरज या देशाला असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.


इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये लावलेली आणीबाणी ती जग जाहीर होती. परंतु अघोषित आणीबाणी असल्याची जाणीव सर्वसामान्यांना होत असल्यामुळे भाजपाच्या विरोधामध्ये प्रचंड जनमत दिवसेंदिवस तयार होत आहे. त्यामुळे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर ,वर्धा ,भंडारा- गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ -वाशिम , गडचिरोली-चिमुर आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असता या सर्वच ठिकाणी उभे असलेल्या महायुतीचे उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे समीक्षात्मक विश्लेषण आता आपण खालील प्रमाणे पाहूया....

*1) भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघ!*
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ वास्तविक पाहता काँग्रेसचा बालेकिल्ला होता. कारण स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत सगळीकडेच काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आणि भंडारा- गोंदिया ही त्याला अपवाद नव्हता. यंदाच्या निवडणुकीत एकूण 18 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाचे सुनील मेंढे महायुतीचे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पाडोळे रिंगणात आहेत. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील असंतुष्टांनी बंडाचा झेंडा उभारलाय! भाजपाचे संजय कुंभलकर हे बसपाच्या तिकीटवर तर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये  हे दोघे अपक्ष मैदानात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडी तर्फे संजय केवट नव्या माणसाला संधी देण्यात आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सुनील मेंढे यांनी तब्बल दोन लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला होता असे असले तरी मेंढे यांनी मागील पाच वर्षात या मतदारसंघात विकास कामे केली नसल्याची ओरड सध्या मतदारसंघांमध्ये सुरू आहे. तसेच त्यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही नगरपरिषदेचे अध्यक्षपद न सोडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्या निमित्ताने तब्बल 25 वर्षानंतर मतदारसंघात काँग्रेसचा पंजाही चिन्ह पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसची पारंपारिक मते त्यांना मिळू शकतात. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पडोळे यांची ताकत असुन दिवंगत यादवराव पडोळे यांचे नाव आणि त्यांची पुण्याई पडोळीची जमेची बाजू आहे. या मतदार संघाच्या नवा चेहऱ्याला संधी देण्याचा इतिहास आहे. हे येथे उल्लेखनीय! बसपाचे उमेदवार संजय कुंभलकर आणि वंचितचे संजय केवटे कोणाची मते घेतात आणि माजी आमदार चरण वाघमारे यांची भूमिका काय राहील या सर्व गोष्टीवर निवडणूक निकाल अवलंबून राहील. त्यामुळे सध्या तरी महायुतीचा उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत असल्याची चर्चा आहे.
                           प्रतिभा धानोरकर

*2) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ!*
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी भाऊ आणि ताई मध्ये काट्याची टक्कर असून भाजपाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगिटवार यांना तिकीट देऊन काँग्रेस पुढे तगडे आव्हान उभे केले जरी असले तरी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी ही हे आव्हान स्वीकारत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचे माहेर वणी असून तालुक्याला लागूनच असलेले वरोरा हे त्यांचे सासर आहे. त्यांचे दिवंगत पती  धानोरकर हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे त्यांचाही मोठा कार्यकर्ता वर्ग या मतदारसंघात असून काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार  यांचाही मतदार संघावर प्रभाव आहे. सोबतच उद्धव सेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर , व शिवसेना नेते संजय दरेकर यांची ही मोठी ताकद  काँग्रेस सोबत असल्याने त्याचाही फायदा प्रतिभाताई धानोरकर यांना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत असून हेच वातावरण कायम राहिले की भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मात करत मुसंडी मारतील हे मात्र निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या सुधीर मुनगिंटवार यांच्या प्रचार करणाऱ्या गाड्याला खेड्यापाड्यात लोक भाजपा सरकारने काय केले? असे विचारून भंडावून सोडणारे  व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्यामुळे भाजपाचा उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.

*3) अकोला लोकसभा मतदारसंघ!*
अकोला लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात महायुती,  महाविकास आघाडी व वंचितमध्ये तिरंगी सामना होत असल्याचे जरी दिसून आले तरी या ठिकाणी वंचितचे एड. प्रकाश आंबेडकर हे सरळ सरळ निवडून येतील अशीच  सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. अकोला मतदारसंघात जातीय राजकारण व मत विभाजनाचे प्रभावी समीकरण हे नेहमीच दिसून आलेले आहे. त्यामुळे यावेळेस देखील परंपरेनुसार पुन्हा भाजपा वंचित व काँग्रेसमध्ये लढत जरी असली तरी भाजपाचे अनुपम धोत्रे काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचितचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर रिंगणात असून त्यांच्या तुल्यबळ सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीच्या मित्र पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नसल्याचे दिसून येत असून महायुतीमध्ये महत्त्व दिल्या जात नसल्याने व प्रहारने अकोल्यात महायुतीला सोडून महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. पक्षांतर्गत नाराज स्वकीय व मित्र पक्षातील नेत्याची समजूत काढण्यातच उमेदवाराचा बराच वेळ खर्ची जात असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा महायुतीचा उमेदवार पराभवाच्या  छायेत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे ऍड प्रकाश आंबेडकर यावेळी बाजी मरतील काय याकडे लक्ष लागले आहे.

*4) अमरावती लोकसभा मतदारसंघ!*
अमरावती लोकसभा मतदारसंघातील तिरंगी लढत होत असुन भाजपा, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षासाठी आगामी विधानसभा निवडणुकी आधीची परीक्षा ठरणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा अंतर्भाव आहे. त्यात एकही भाजपाचा आमदार नाही. त्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा ह्या काल 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेल्या असता काँग्रेस जिंदाबादचे नारे त्या ठिकाणी लावण्यात आले. असे व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर वायरल झालेले असून अचलपूरचे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी यावेळी थेट नवणित राणा यांच्या विरोधात रणसिंग फुंकलेले आहे. आणि त्यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बुब  यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे नवनीत राणासाठी ही निवडणूक जोखीमिची मानली जात आहे. आणि भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस सह असलेल्या महाविकास आघाडी मधील सर्वच पक्षातील नेत्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याची जोरदार चर्चा आहे.

*5) वर्धा लोकसभा मतदारसंघ!*
महायुतीचे उमेदवार असलेले  खासदार रामदास तडस हे या ठिकाणी निवडून येण्यासाठी प्रचाराची जोरदार फील्डिंग करत असले तरी आर्वी मध्ये भाजपाचे कार्यकर्त्याकडून दोन दोन प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असून त्यामुळे स्थानिक पातळीवर गोंधळ निर्माण झालेला आहे. आता कार्यकर्त्याला प्रश्न पडलेला आहे की कोणता झेंडा घेऊ हाती असे प्रश्न विचारून महायुतीच्या उमेदवारा मध्ये पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा महायुतीचा उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याचे कळते.

*6) यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघ!*
यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघ म्हणजे महानायक वसंतरावजी नाईकसाहेब आणि जलनायक सुधाकरराव नाईकसाहेब यांची कर्मभूमी असून यापूर्वी वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकरराव नाईक साहेब यांनी या लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 1977 साली  इंदिरा गांधी पराभूत झाल्या परंतु वसंतराव नाईक साहेब या लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले होते. यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उबाठा गटाने सुरुवातीलाच संजय देशमुख यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांनी प्रचारांमध्ये आघाडी घेतली होती. महायुतीकडून उमेदवार देण्यामध्ये प्रचंड उशीर झाला आणि बंजारा समाजाची जवळपास साडेपाच लाख मतदान असल्यानंतरही बंजारा समाजाला राष्ट्रीय पक्षाने उमेदवार न दिल्यामुळे प्रचंड नाराजी या मतदारसंघात आजही दिसून येत आहे. बंजारा समाजाला उमेदवार न दिल्यामुळे बंजारा समाजाची मते निर्णय ठरणार असून महायुतीच्या राजश्री पाटील या बाहेरच्या उमेदवार असल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांचे पती माजी खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आदिवासी आणि बंजारा समाजाच्या डॉक्टराला शौचालय साफ करण्याची पाळी आणल्यामुळे आदिवासी आणि बंजारा समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. या ठिकाणी वंचित चे उमेदवार अभिजीत राठोड यांचा अर्ज रद्द झाल्यामुळे वंचितची मते ही कोणाकडे जातात हे पाहणे महत्त्वाचे आहे. खरी लढत समनक जनता पार्टीचे प्रा. डॉ. अनिल राठोड आणि संजय देशमुख यांच्यामध्ये असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून  समनक जनता पक्षांनी प्रचारांमध्ये घेतलेली प्रचंड आघाडी त्यामुळे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील हे सध्या तरी पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे. त्याचे दुसरे कारण असे की, 68% ग्रामीण मतदारांमध्ये भाजपा सरकार विरूद्ध प्रचंड रोष असून जवळपास 14 लाख 19 हजार 322 ग्रामीण मतदार आहे. शेतमालाला भाव, नैसर्गिक आपत्तीची थांबलेली मदत, एकूणच शेतीची होत असलेली आर्थिक कोंडी, आरोग्याच्या समस्या, शिक्षणाचा प्रश्न आणि तब्बल 302 शेतकऱ्यांनी केलेले आत्महत्या यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, गहू ,हरभरा, ज्वारी, भुईमूग, तीळ अशा सर्वच कमी अधिक प्रमाणात नुकसान झालेले असून प्रचंड वाढलेली बेरोजगारी, मजुराचे स्थलांतर, सिंचनाचा प्रश्न तसेच मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या बाबतीत असलेली भूमिका, आदिवासी समाज, मुस्लिम समाज आणि बंजारा समाजाने गुपित केलेला निर्णय. मतदारांना जातीपातीच्या भुलथापा देऊन धार्मिकतेचे आव्हान करीत धार्मिकतेच्या मुद्द्यावर मत मागण्याचा जो प्रयत्न केलेला आहे‌.  त्यामुळे या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सध्या तरी पराभवाच्या छायेत असल्याचे चित्र उभे राहिलेले आहे.

*7) रामटेक लोकसभा मतदारसंघ!*
भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना सलग दोन वेळा ज्या मतदार संघांनी लोकसभेत पाठवले तो महाराष्ट्रातील मतदार संघामध्ये विदर्भातील रामटेक होय.  नरसिंहरावामुळे रामटेकला राष्ट्रीय पटलावर नवी ओळख मिळाली. ही झाली या मतदारसंघाची राजकीय ओळख दुसरी ओळख म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आपल्या 14 वर्षाच्या वनवासात रामटेकला  आले होते. अशी आख्यायिका आहे .प्रभू रामचंद्र मुळेच या गावाला रामटेक नाव मिळाले‌. मेघदूतम सारख्या विश्वविख्यात  काव्याची रचना कवी श्रेष्ठ कालिदासांनी रामटेकला रचली. त्यामुळे रामटेक चे नाव प्रसिद्ध आहे. यंदा या रामटेक मतदार संघामध्ये राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना तिकीट मिळालेले आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे कुमार बर्वे रिंगणात असून अपक्ष म्हणून आयएएस अधिकारी राहिलेले किशोर गजभिये यांनी रिंगणात उडी घेतलेली आहे. यंदा रामटेक च्या निकालाकडे राज्याच्या विशेषतः विदर्भाच्या जनतेचे लक्ष लागले आहे. कारण या लोकसभा मतदारसंघात कोणाचा विजय होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. मोठ्या प्रकारच्या असलेल्या खाणीमुळे येथे परप्रांतीयांची संख्या जास्त आहे. येथे मोठ्या प्रमाणावर दलित आणि मुस्लिम मतदार असल्याने हा पारंपारिक रित्या काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु वंचित बहुजन आघाडीने अपक्ष गजभिये यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. वास्तिक पाहता शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे हे काँग्रेसचे माजी आमदार होते. त्यांच्या उमरेडच्या बाहेर प्रभाव नाही. उमेदवारी घोषित होईपर्यंत लोकसभा मतदारसंघातील अनेकांना त्यांचा चेहरा देखील माहिती नव्हता. पण सध्या त्यांच्या मागे भाजपाने जरी संघटनात्मक शक्ती उभी केली तरीही राजू पारवे हे पराभवाच्या छायेत असल्याची चर्चा रामटेक मतदार संघामध्ये  असल्याचे कळते. यावेळी या मतदारसंघात एकूण 28 जण रिंगणात आहेत. प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात "धनुष्यबाण रामाचा, राजू पारवे कामाचा" भाभी रहे या भैय्या विरोधी लोंगो की डुबेगी नंया !
अशा घोषणाने जरी वातावरण तापलेले असले तरीही पारवे विरुद्ध बर्वे यांच्यातील या लढतीत मोदी मॅजिक प्रभावी ठरणार की शिवसेना विजयाची हॅट्रिक करणार की जेणेकरून काँग्रेस हा मतदारसंघ हिसकावून घेणार हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

*8)गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ!*
गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघ हा 2008 मध्ये झालेल्या मतदार संघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेला आहे. राज्यातील सर्वात मोठा मतदार संघ म्हणून या मतदार संघाची ओळख आहे. याखेरीज नक्षलवादी हिंसाचारामुळे हा जिल्हा देशभरात ओळखला जातो. या लोकसभा मतदारसंघांमध्ये 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवलेला असून यंदाच्या निवडणुकीत हॅट्रिक करण्यासाठी पक्षाचे विद्यमान खासदार अशोक नेते रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेस तर्फे डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली असून सध्या या मतदारसंघात 10 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत महायुती  विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्येच आहे. गडचिरोली -चिमूर या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदार संघात तीन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. देशाच्या राष्ट्रपती यांना संसदेच्या उद्घाटनाला व प्रभु  राम लल्ला मंदिर  उद्घाटनाला न बोलावल्यामुळे आदिवासी समाजामध्ये भाजपा विरोधी नाराजी असल्याची सर्वत्र चर्चा असून या मतदारसंघात ज्याप्रमाणे मागील दोन निवडणुकांमध्ये मोदी लाटेमुळे भाजपाला यश आले पण यंदा मात्र त्यांना विजयासाठी झुंजावे लागणार आहे. एकंदरीत याही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याचे बोलल्या जात आहे.

*9) बुलढाणा लोकसभा मतदारसंघ!*
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात बंड करणारे भाजपाचे लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराव शिंदे व आघाडीचे शिवसेना उबाठा उमेदवार नरेंद्र खेडकर यांच्या विरोधात बंड पुकारणारे ज्ञानेश्वर दादा पाटील या दोघांनी  अर्ज मागे घेतल्याने दोन्ही प्रमुख पक्षातील बंडाळी थांबलेली असून महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे  माजी खासदार प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा प्रचंड वर्ग हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात असल्यामुळे या ठिकाणी शिवसेना उबाठा गटाचा उमेदवार बाजी मारेल अशी चर्चा रंगत असल्यामुळे या ठिकाणीही महायुतीचा उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याची चर्चा सगळी कडे ऐकायला मिळत आहे.

*10 ) हिंगोली लोकसभा मतदारसंघ!*
हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये बाबुराव कदम कोळेकर शिवसेना (शिंदे गट )विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये सरळ लढत असून वंचितचे उमेदवार डॉ. बि‌.डी. चव्हाण यांनी या निवडणुकीमध्ये प्रचारात रंगत भरलेली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा आणि त्यानंतर सेनेचा बालेकिल्ला होता. मांडवीचे उत्तमराव राठोड यांनी या लोकसभा मतदारसंघाचा जवळपास पाच ते सहा वेळा प्रतिनिधित्व केले असून मोदी लाटेमध्येही राजीव सातव हे काँग्रेसचे उमेदवार महाराष्ट्रातून एकमेव निवडून आले होते. सध्या हा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाकडे होता. त्यामधील माजी खासदार हेमंत पाटील हे शिवसेना फुटीमध्ये शिंदे गटाकडे गेल्यामुळे या ठिकाणी शिवसेना उबाठा गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली असून सध्या तरी नागेश पाटील आष्टीकर  यांनी प्रचारांमध्ये आघाडी घेतलेली आहे. असली तरीही  डॉ. बि.डी. चव्हाण यांनी सुद्धा प्रचारांमध्ये आघाडी घेतली असल्यामुळे खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार विरुद्ध वंचितचे उमेदवार मध्येच आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याची सर्वत्र चर्चा खेड्यापाड्यात दिसून येत येते.

*11) नागपूर लोकसभा मतदारसंघ!*
संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे सामाजिक क्रांती केली ती दीक्षाभूमी असलेला नागपूर लोकसभा मतदार संघ होय.  हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरचे आणि भौगोलिक दृष्ट्या देशाच्या मध्यस्थानी असलेले शहरही नागपूरच आहे. असे विविधांगी ओळख असलेले नागपूर सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय दृष्ट्या केंद्रस्थानी आलेले आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी तिसऱ्यांदा निवडणूक लढत असून त्यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्याशी असून गडकरींनी केलेला विकासाचा दावा विरुद्ध काँग्रेसचा विकास  (विकास ठाकरे)  असे या लढतीचे स्वरूप आहे. गडकरी म्हणजे भाजपामधील एक सर्वोत्तम व्यक्तिमत्व असून ते अजातशत्रू आहेत. राजकारणामध्ये गडकरी ला कोणाचाही विरोध असेल असे तरी वाटत नाही. गडकरी यांच्या जमेच्या बाजूमध्ये संघटनात्मक बळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारातील आघाडी, गडकरींनी पहिल्या पाच वर्षात शहरात केलेला पायाभूत सुविधांचा, विकास, राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्थांचे जाळे, सिमेंट रस्ते, उडान पूल ही दृश्य स्वरूपातील विकास कामामुळे गडकरी विकास पुरुष म्हणून सर्वांच्या स्मरणात आहेत. गडकरी विषयी नागपूर लोकसभा मतदारसंघातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपुलकीची भावना आहे. या बाबी निवडणुकीत त्यांची बाजू भक्कम करू शकतात. त्यांच्याविरुद्ध असलेले काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्या नगरसेवक ,आमदार ही कारकीर्द त्यांची जमेची बाजू असून यातूनच लोकांसाठी संघर्ष करणारा धडाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे. नागपूर मध्ये एकूण 26 उमेदवार रिंगणात असले तरी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता असून एरवी दलित आणि मुस्लिम मताचे विभाजन भाजपाच्या पत्त्यावर पडणारे ठरते. परंतु या निवडणुकीत ही शक्यता कमी आहे. वंचित ने काँग्रेसला पाठिंबा दिला असला तरी एमआयएमचा उमेदवार नाही. बसपाचे योगेश लांजेवार रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी मायावती आणि सभा घेतली.   तेली, माळी, कुणबी या बहुजन समाजातील प्रमुख जात समूह आणि समूहांची मतदार संख्या मोठी आहे. त्यांच्या खालोखाल दलित, अल्पसंख्याक आणि हलबा या समाजाची मते असून त्यांचा कल निर्णायक ठरणार असतो. 2014 , 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये नितीनजी गडकरी हे निवडून आलेले आहे. त्यामुळे यावेळेसही काँग्रेसने कितीही अपप्रचार केला आणि गडकरी डेंजर झोन मध्ये असल्याची हवा जरी केली असली तरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीनजी गडकरी हेच जिंकणार अशीच सर्वत्र नागपूरच्या चौका चौकात चर्चा पाहायला मिळते असे असले तरी भाजपची विरोधी लाट मोठी आहे. त्यामुळे तिथेही आणीबाणीची वेळ आली आहे. विकास ठाकरे यांनी देखील प्रचारात मोठी उसंडी मारली आहे. 
विदर्भातील संपूर्ण महायुतीच्या सीटा  सध्या जरी पराभवाच्या छायेत असल्या तरी नागपूर लोकसभा मतदारसंघातील माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विजयाच्या दिशेने आगेकूच करत असल्याची वार्ता सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून दररोज ऐकायला आणि वाचायला मिळते. त्यामुळे नागपूर लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री आणि विकास पुरुष नितीनजी गडकरीच तिसऱ्यांदा विजयी होईल यात शंका घेण्याचे काही कारण नाही.

परंतु बुलढाणा, अकोला, अमरावती, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली- चिमूर ,यवतमाळ- वाशिम ,भंडारा- गोंदिया आणि हिंगोली मतदारसंघातील महायुतीच्या सर्वच सीटा पराभवाच्या छायेत असल्याची जोरदार चर्चा विदर्भामध्ये सुरू असून घोडा मैदान जवळ आहे.!

✍️राजकीय विश्लेषक याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद- 94 21 77 43 72*
लेखनकाळ- 15 एप्रिल 2024