Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांवर आली सहकुटुंब उपोषणाची वेळ

 

दोन वर्षापासून वितरण कंपनीकडून शेतकऱ्याची पिळवणूक

वणीच्या आमदारानी दिला पुरस्कार परत करायचा सल्ला - शेतकऱ्याचा आरोप

प्रतिनिधी

दिलीप भोयर

वणी :-  तालुक्यातील मोहूर्ली येथील कृषी विभागाकडून आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त असलेले शेतकरी कवडू देवाजी वडस्कर यांना कृषिला जोड व्यवसाय करण्यासाठी वीज जोडणी मागील दोन वर्षापासून मिळत नसल्याने शेवटी वणी येथील वितरण कंपनीच्या जाचाला त्रस होऊन वीज जोडणी न मिळाल्यास कुटुंबासह आमरण उपोषणाला बसण्याचा वेळ या शेतकऱ्यावर आली असून सदर पुरस्कार देखील परत करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी तहसीलदार वणी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

कवडू देवाजी वडस्कर हे शेतकरी  नैसर्गिक शेतीचा प्रयोग करून शेतात नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवित आहे. केवळ शेतीच्या आधारावर शेतकऱ्यांना कुटुंब चालविणे अत्यंत अवघड असल्याने सातत्याने सरकार देखील शेतकऱ्यांना शेतीला जोड धंदा करण्यासाठी सूचीत करत असतात व त्यासाठी विविध योजना देखील अमंलणात आहे. दरवर्षी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांवर करोडो रुपये योजने मार्फत खर्ची घालतात परंतु जेव्हा स्वतः शेतकरी काही जोड धंदा उभारणीसाठी प्रयत्न करतो तेव्हा मात्र प्रत्यक्षात सरकारचे धोरण आडवे येत असतात तर कधी अधिकारी वर्ग चिरीमिरीतसाठी शेतकऱ्याची अडवणूक करीत असतात. याबाबत वणी येथील वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून अनुभव येत आहे. 

कवडू वडस्कर यांनी शेतीला जोड धंदा म्हणून नैसर्गिक पद्धतीने गूळ उत्पादन करायचे ठरविले व त्याच बरोबर रस्वांतीचा हंगामी उद्योग सुरू केला आहे. त्यासाठी सन २०२२ पासून वितरण कंपनीकडे आपल्या चपला झिजवत आहे. परंतु या ना त्या कारणाने त्यांना वितरण कंपनी माघारी पाठवत आहे. दोन वर्षापासून चकरा मारुन मारून शेवटी वीज जोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मार्च महिन्यात ६ हजार २०० रुपये देखील डिमांड भरण्यात आली आहे. एक महिना लोटूनही वीज जोडणीसाठी वितरण कंपनी हुलकावणी देत असल्याने शेवटी त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने वीज द्या अन्यथा सहकुटुंब. आमरण उपोषणला बसू असा इशारा तहसीलदार वणी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 


जिल्हा कृषी विभागामार्फत आदर्श शेतकरी म्हणून वडस्कर यांचा गौरव

यवतमाळ जिल्हा कृषी विभागामार्फत १४ ते १८ जानेवारी २०२४ दरम्यान भरविण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी प्रदर्शनी मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे ,  आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, वरिष्ठ जिल्हा सामान्य समन्वय अधिकारी , महिला विकास आर्थिक महामंडळ यवतमाळचे रंजन वानखेडे यांच्या स्वाक्षरीने आदर्श शेतकरी म्हणून सन्मान पत्र व पुरस्कार  कवडू वडस्कर यांना बहाल केले आहे. एका आदर्श शेतकऱ्यांना वितरण कंपनी कडून पिळवणूक होत असेल तर सामान्य शेतकऱ्यांना किती हाल सोसावे लागत असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.


आमदार बोदकुरवार यांनी दिला पुरस्कार परत करायचा सल्ला 

मागील दोन वर्षापासून वितरण कंपनी कडून वारंवार होत असलेली पिळवणूक एक लोकप्रतिनिधी म्हणून संबंधित शेतकरी कवडू वडस्कर यांनी आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांना सांगितली व एका आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची समस्या  निकाली काढा अशी विनंती केली व निकाली निघत नसेल तर मला मिळालेला पुरस्कार परत करायचा का ? असा प्रश्न केला असता आमदार महोदयांनी वितरण कंपनी कडून शेतकऱ्यांची समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न न करता सरळ पुरस्कार परत करण्याचा सल्ला देवून एक प्रकारे शेतकऱ्यांचा अपमान केला असल्याचा आरोप पीडित शेतकरी कवडू वडस्कर यांनी वणी न्युज टुडे सोबत बोलताना करीत हा पुरस्कार परत करणार असल्याची माहिती दिली. आमदार महोदयांच्या या सल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे.